कुडे लेणी

kude caves

कुडे मांदाड ही बौध्दकालीन लेणी खाजगी भालगाव पुलामुळे मुरूड शहरापासून दक्षिणेस केवळ २५ किमी. अंतरावर आहेत. मुंबई-गोवा हाय वे वरील माणगांवपासून २१ किमी वर हे गाव राजपूरी खाडीच्या मांदाडउपखाडीवर असून या गावाच्या पूर्वेकडील महोबा डोंगरावर ही लेणी आहेत. ही लेणी पहाण्यास स्वतचे वाहन असेल तर थेट लेण्यांपर्यंत पोहचता येते.

इ.स.पूर्व १०० वर्षाच्या काळात दंडा राजपुरी येथे सातवहनांचे सामंत महाभोज याची राजधानी होती. त्यांनी बौध्द भिक्षुकांच्या वास्तव्यासाठी खोदलेली ही लेणी समुद्रसपाटीपासून २०० फुट उंच असून एका डोंगर रांगेत इस १८४८ साली डोंगराच्या कपारीतील या लेण्यांचा शोध लागला. रौद्र कातकाळातील ही २६ लेणी दोन स्तरांत असून लेणी क्र. १ ते १५ खालच्या रांगेत व लेणी क्र. १६ ते २६ वर आहेत. यात ५ चैत्य व २१ विहार असून त्यात ब्राम्ही लिपीतील प्रकृत व संस्कृत शिलालेख आहेत. आत एक भव्य स्तूप आहे. लेण्यांच्या सुरूवातीला असलेले खांबदेखील खूप देखणे असून येथील पाण्याची टाकीही पाहण्यासारखी आहेत.

हा सगळा परिसर पश्चिमाभिमुख असून येथून समोर अथांग अरबी समुद्र पूर्वेस तळा उत्तरेस घोसाळा किल्ला दिसून येतो. शतकानुशतके समुद्रावरून येणारे जोरदार वारे नैरुत्य मान्सुन पावसाचे तडाखे यांना ही लेणी तोंड देत असल्यामुळे काळाच्या प्रवाहात काही शिलालेख व प्रतिमा झिजून अस्पष्ट झाल्या आहेत. तरीदेखील बरेच शिलालेख अजूनही वाचता येतात. ही लेणी म्हणजे भिक्षुकांचे ध्यानधारणा व निवास करण्याचे एकांतातील अतिशय निसर्गरम्य परिसर असलेले त्याच काळातील मोठे स्थान असावे असे वाटते. एससंध दगडी डोंगर कोरून निर्माण झालेल्या लेणी पहाताना पहाणार्‍याच्या चेहर्‍यावर आश्चर्यमिश्रीत भाव सहज उमटतात.

Add new comment