मुरुड-जंजिरा किल्ला (Murud Janjira Fort)
मुरुड-जंजिरा किल्ला हा जलदुर्ग असून तो अरबी समुद्रकिनाऱ्यावरती वसलेल्या मुरुड शहरानजीक आहे. राजापुरी बंदरातून किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटींची सोय आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा राजापुरी किनाऱ्याकडे तोंड करून असून दुसरा दरवाजा खुल्या अरबी समुद्राकडे आहे. पश्चिमेकडे समुद्राकडे तोंड करून एक दरवाजा असून त्याला ‘दरिया दरवाजा’ असे म्हणतात. किल्ल्याच्या दोनही बाजूंना बुरुज आहेत, त्याच्यावर एका सिंहाच्या पायाखाली चार, तोंडात एक व शेपटीत एक, असे सहा हत्ती पकडलेलं शिल्प कोरलेल आहे. या मुख्य दरवाजातुन आत गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो. दरवाज्याच्या जवळच पीरपंचायतन असून, तेथील पटांगणात पीरमखानच्या जहाजाचे तीन नांगर पाहाता येतील. येथुन पुढे गेल्यावर एक मोठा गोडयापाण्याचा तलाव दिसतो. तलावाजवळ खाशा सिद्यीची मशिद असुन, आजूबाजूला घरांचे पडके अवशेष दिसतात. दरवाज्या जवळील दोन बुरुज धरुन, किल्ल्याला एकुण २४ बुरुज आहेत. प्रत्येक बुरुजाला वेगवेगळी नावे आहेत. जंजिर्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथील प्रवेशव्दाराच्या वरील बाजुस नगारखान्या शेजारी असणार्या तीन तोफा. कलालबांगडी, चावरी व लांडा कासम अशी या तोफांची नावे आहेत. जंजिर्याचा इतिहास पाहीला तर साधारणपणे पंधराव्या शतकात कोळयांचा प्रमुख राम पाटील याने चाचे व लुटारुंपासुन कोळयांचा बचाव करण्यासाठी दंडाराजपुरीच्या खाडीतील बेटावर मेढेकोट (लाकडी ओंडक्यांचा किल्ला) बांधला. पुढे या पाटलाचा बंदोबस्त करण्यास निजामाने पीरमखान याची नेमणुक केली, त्याने राम पाटलाचा बंदोबस्त करुन मेढेकोट ताब्यात घेतला. पीरमखानच्या मृत्यु नंतर साधाराणतः सन १५३८ मध्ये त्याच्या जागी बुर्हाणखानची नेमणुक करण्यात आली. त्याने मेढेकोट पाडून १५६७ ते १५७१ या काळात पक्का दगडी किल्ला बांधला व त्याचे नामकरण 'किल्ले महरुब' असे केले. छत्रपती शिवराय, राजे संभाजी, पेशवे, आंग्रे अशा अनेकांनी जंजिरा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जंजिरा संस्थान भारतात विलीन करण्यात आले. किल्ल्याच्या बुरुजावरती युरोपीय तसेच स्वदेशी बनावटीच्या अनेक तोफा पहावयास मिळतात. सध्या जीर्णावस्थेत असलेल्या किल्ल्यावरती पुरातन काळी हरतर्हेच्या सोयीसुविधा जसे महाल, दराबारीसाठी खोल्या, मशीद, दोन छोटी गोड्या पाण्याची तळी इत्यादी उपलब्ध होते. जंजिराच्या नवाबासाठी असलेला महाल अजूनही सुस्थितीत आहे. किल्ला पाहण्यासाठी राजापुरी येथील जेटीवरुन शिडाच्या होडयांची सोय ’’ जंजिरा पर्यटक संस्था मर्या. राजापुरी ’’ या संस्थेनी केली आहे. सकाळी ७.०० वाजल्या पासुन सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत किल्ल्यात जाण्या येण्यासाठी होडया उपलब्ध असतात. कमीत कमी २० प्रवासी जमल्यावर होडी सोडण्यात येते. होडीने प्रवास करण्यास लागणारी तिकीटे जेटीवर उपलब्ध असतात. साधाराण १० ते १५ मिनीटात होडीने किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ल्यात उतरण्यासाठी धक्का नसल्याने सावधानतेने उतरावे लागते.







Add new comment