खांदेरी किल्ला (khanderi fort)

khanderi fort

अलिबागपासून ४-५ किमी. अंतरावर थळच्या किनार्‍यापासून ३ किमी. अंतरावर खांदेरी बेट आहे. या बेटावर १६७८ साली किल्ला बांधण्यात आला. आजूबाजूचा परिसर खडकाळ असून बेटावर १५-२० मीटर उंचीच्या टेकडया आहेत. टेकडयांच्या मधला भागही पाण्यापासून २०*२५ फूट उंचीवर आहे. तिथे जवळच बोटीचा धक्का आहे. या बेटाच्या भोवतालचा भाग खूपच खडकाळ असल्याने बोटींना मार्गदर्शन व्हावे म्हणून इथे १७६८ साली दिपगृह उभारण्यात आलं. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही गोडया पाण्याची विहीर आहे. दीपगृहाच्या रस्त्यावर एक प्रचंड शिळा असून जर एखादया छोटया दगडाने त्या शिळेवर आघात केला तर एखाद्या भांडयावर दगड मारल्यास जसा आवाज येतो. तसा आवाज येतो.
किल्ल्याची तटबंदी शाबूत असून किल्ल्याचे दरवाजे मात्र शाबूत नाहीत. खांदेरी किल्ल्याचा तत्कालीन इतिहास थोडक्यात असा आहे. शिवछत्रपती खांदेरी बेटावर किल्ला बांधत आहेत ही बातमी जेव्हा इंग्रजांना समजली तेंव्हा इंग्रजांनी मायनाक यास बांधकाम थांबिवण्याचा आदेश दिला. परंतु मी फक्त छत्रपती शिवरायांचा हुकूम मानणारा सेवक आहे तुम्ही आदेश देणारे कोण असे रोखठोक प्रति उत्तर मायनाक यांनी पाठविले. १६७९ साली थळच्या किनार्‍यावर उभयपक्षी अनेक लहान मोठया चकमकी उडाल्या. अशा तर्‍हेने इंग्रजांना छत्रपतींचे आरमारी सामर्थ्य मान्य करावे लागले. १७७५ साली खांदेरी इंग्रजांच्या ताब्यात होता. १७८७ साली राघोजी आंग्रेंनी ताबा घेतला. १८१४ साली खांदेरीचा ताबा दुसरा बाजीराव पेशवे यांच्याकडे गेला. पुन्हा १८१७ रोजी खांदेरीचा ताबा आंग्रेजवळ आला.
सध्या खांदेरी किल्ला मुंबई पोर्ट टस्टच्या ताब्यात असल्याने किल्ल्यावर त्यांच्या परवानगीनेच जाता येते. किल्ल्यात स्थानिक कोळ्याच्या बोटीने जाता येते.

Add new comment