श्रीवर्धन तालुक्यातील शिलाहारांची प्राचीन राजधानी असलेले दिवेआगर हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथे तांब्याच्या पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडल्याने ह्या स्थानास धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील श्री रूपनारायण मंदिर हे देखील दर्शनीय आहे. ह्या प्राचीन गावाला महाराष्ट्राच्या, मराठी भाषेच्या आणि देवनागरी लिपीच्या इतिहासातहि विशेष जागा आहे. ह्याचे कारण म्हणजे ह्या जुन्या पण समृद्ध गावात सापडलेले तीन ताम्रपट आणि शिलालेख.