दिवेआगर चा शिलालेख
दिवेआगर ह्या प्राचीन गावाला महाराष्ट्राच्या, मराठी भाषेच्या आणि देवनागरी लिपीच्या इतिहासातहि विशेष जागा आहे. ह्याचे कारण म्हणजे ह्या जुन्या पण समृद्ध गावात सापडलेले तीन ताम्रपट आणि शिलालेख. ह्यांपैकी पहिला लेख म्हणजे शके ९८२ (इसवी १०६०) मध्ये कोरलेला एक ताम्रपट, जो दिवेआगरात मिळाला आणि ज्याच्यामध्ये दिवेआगराचा उल्लेख आहे. हा मराठीमध्ये लिहिलेला आहे असे वाचताक्षणी कळते आणि मराठी लेखांमध्ये तो श्रवणबेळगोळाच्या लेखानंतर (इसवी ९८१) लगेचच येतो. मराठीतील दुसर्या क्रमांकाचा जुना असा हा लेख असावा आणि त्यामुळे मराठी भाषेच्या इतिहासातील तो एक महत्त्वाचा दुवा आहे. हा ताम्रपट आणि त्याचे वाचन असे आहे: शके ९८२ मध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी वासुदेवभट्ट आणि शिव घैसास ह्यांनी दोन शासने मावलभट्टापाशी ठेव म्हणून जमा केली. तसेच सात, वीस आणि शंभर सुवर्ण योगक्षेमासाठी ठेविली. ह्याला दिवेआगरचे पौवदेव, तिकै, जीवण, नागरुद्रभट्ट, मधुवै आणि देवल हे साक्ष आहेत. दुसरा छापील पृष्ठ १७२ येथील लेख महामंडलाधिपति अनंतदेव (अखेरीच्या दिवसातील शिलाहार राजा?) ह्याच्या काळात आषाढ कृष्ण अष्टमी शक ११७६ (जुलै ९, १२५४) ह्या दिवशी राजाचा एक मांडलिक राम ह्याने दीपक गावातील गणपति नायक नावाच्या ब्राह्मणाला एक वाटिका दान केली हे नोंदविणारा शिलालेख आहे. हा लेख अजूनहि दिवेआगरातच आहे. लेख अशुद्ध संस्कृतात असला तरीहि त्यामध्ये ’शकु संवतु’ असा स्पष्ट मराठी प्रयोग आहे. ह्या लेखाच्या प्रारंभी ’यावच्चन्द्रदिवाकरौ’ अशा अर्थी सूर्यचंद्रांचे आणि तळाशी ’गद्धेगाळी’चे चित्र आहे. ह्या दुसर्या चित्राचा अर्थ असा. लेखाद्वारे दिलेल्या देणगीत नंतरच्या काळात कोणीहि ढवळाढवळ करू नये अशी स्पष्ट तंबी लेखातच लिहिण्याची पद्धत होती आणि ती तंबी न मानणार्यावर काय आपत्ति येईल हेहि लिहून ठेवत. कधीकधी रौरवासारख्या नरकात पडण्याची भीति घातली जाई. पुष्कळदा त्यापलीकडे जाऊन नियम मोडणार्याच्या आईवर गाढव अत्याचार करेल असाहि शाप असे आणि त्या शापाचे चित्र - एक गाढव आणि बाई - शेवटी कोरत असत. हेच ते ’गद्धेगाळी’चे चित्र. हे तीनहि लेख देवनागरीमध्ये आहेत. साधारणतः ह्या लेखांच्या काळाच्या थोडे आधी ब्राह्मी लिपीचे सिद्धमातृका लिपीत, आणि त्या लिपीतून देवनागरी, गुजराथी, बंगाली अशा लिप्यांमध्ये रूपान्तर झाले असा तज्ञांचा समज आहे. मराठीच्या बाळबोध लिपीचा हा उगम आहे.







Add new comment