महाड (Mahad)
महाड येथील १९२७ सालचा चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. चवदार तळे तत्कालीन अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आंदोलनामुळे चवदार तळ्यास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आंदोलनाची आठवण म्हणून येथे क्रांतिस्तंभ उभारण्यात आला आहे. एकेकाळी हे ‘महिकावती’ या नावाने ओळखले जात असल्याचे सांगितले जाते. ‘बलिपटना’ आणि ‘पलईपटभाई’ असेही याचे जुने नामोल्लेख आढळतात. महाडच्या वायव्येस तीन किमी. वरील पाली टेकड्यांत इ. स. पहिल्या शतकातील तसेच दक्षिणेस १.५ किमी. वरील कोल काही बौद्ध गुहा आहेत. महाड हे एक अंतर्गत बंदर आहे. महाडच्याच थोड्या खालच्या बाजूस गांधारी-सावित्री या नद्यांचा संगम होतो. उधानाच्या भरतीच्या वेळी नदीतील पाण्याची पातळी सु. २.७५ मीटर वाढते त्यामुळे महाडपर्यंत बोटी येऊ शकतात. इतर भरतीच्या वेळी महाडच्या वर १.५ किमी. पर्यंत डोंगी (नावा) येऊ शकतात. अशा प्रकारे येथील जलवाहतूक बरीचशी भरतीच्या पाण्यावर अवलंबून असते.
