फणसाडचे अभयारण्य (Phansad Reserve Forest)

phansad reserve forest

आपल्या देशात बरीचशी अभयारण्ये ही तत्कालीन राजे तसेच संस्थानिक यांनी त्यांच्या शिकारीच्या हौसेकरीता राखून ठेवलेल्या क्षेत्रांपैकी आहेत. नबाब काळातील केसोलीचे जंगल म्हणजेच आताचे फणसाड अभयारण्य ही जंगलसंपत्ती नबाबाचे शिकारक्षेत्र होते. आम जनतेस याठिकाणी शिकार करण्यास बंदी होती. एका बाजूला अरबी समुद्र व दुसर्‍या बाजूला गर्द वनराईने नटलेला डोंगराळ प्रदेश असलेले हे अभयारण्य ५२.७१ चौ.किमी. क्षेत्रात पसरलेले आहे. या अभयारण्यात बिबळया वाघ तरस कोल्हा सांबर भेकर रानडुक्कर पिसोरी ससे साळींदर व दुर्मळ शेकरू आढळतात. शेकडो प्रकारचे पक्षी फुलपाखरे वनस्पती औषधी झाडे सरपटणारे विविध प्राणी यांनी हे अभयारण्य परिपूर्ण आहे. नेहमीच्या वृक्षांबरोबरच फणसाड येथे अशोक, कुरडू, नरक्या, सर्पगंधा, सीता यांसारख्या औषधी वनस्पती आहेत. गारंबीच्या वेली हे या अभयारण्याचे वैशिष्ट्य आहे.या वेलीची लांबी १०० मीटरहून अधिक असते. वेलींच्या शेंगांमधील गर येथील शेकरूंना खूप आवडतो. महराष्ट्र राज्य शासनाने राज्य फुलपाखराचा मान दिलेले ब्लू मॉर्मॉन फुलपाखरू फणसाडमध्ये मोठ्या संखेत दिसते. महाराष्ट्राचे आणखी एक मानचिन्ह असलेले शेकरू येथे आहेत. याशिवाय कोल्हा, तरस, पिसोरी, बिबट्या, भेकर, माकड, मुंगूस, रानमांजर, रानससा, वानर, सांबर, साळिंदर आदी प्राणीही आहेत. बिबट्याचे हमखास दर्श येथे घडते. घोणस, नाग, फुरसे, मण्यार आदी विषारी आणि तस्कर, हरणटोळसारखे बिनविषारी साप या अभयारण्यात आहेत. धनेश पक्षी हा या अभयारण्यात हमखास दिसतो. पर्यावरणीय दृष्टीकोनातून पर्यटनाला प्रात्साहन देण्यासाठी वनखात्यातर्फे सुपेगावजवळ निसर्ग भ्रमणाची सोय करण्यात आली आहे. अभयारण्यात माहिती केंद्रे असून रहाण्याची सोयही उपलब्ध आहे.

Add new comment