चौल हे अलिबागच्या दक्षिणेस १८ किलोमीटरवर असलेले सातवाहनकालीन प्राचीन बंदर आहे. येथल्या प्रसिद्ध अक्षी-नागावप्रमाणे चौल-रेवदंडा हीदेखील एक जोडगोळी समजली जाते. मूळच्या चौलच्या दोन-तीन पाखाड्या स्वतंत्र करून रेवदंडा आकारास आले; परंतु आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल-रेवदंडा असा एकत्रित होतो. चौलचा अगदी प्राचीन उल्लेख ‘पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी’ या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या प्रवासवर्णनात येतो. चौलजवळच्या वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी या काळाचे चौलशी असलेल्या नाते दाखवते, पण चौलच्या प्राचीन बंदराविषयी कुठलेच पुरावे मिळत नव्हते. तेव्हा याच्याच शोधात पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वतीने २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे चौलमध्ये वेगवेगळ्या भागांत उत्खनन करण्यात आले आणि त्‍यातून हे प्राचीन बंदर प्रकाशात आले. दोन हजार वर्षांपूर्वीच्या या प्राचीन बंदरातून इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश आणि अगदी चीन असा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होता. चौल हे त्यावेळी जगाच्या नकाशावर भरभराटीला आलेले नगर होते उत्खननात चौलच्च्या प्राचीन बंदराचे अवशेष, ‘जेटी’ची भिंत, सातवाहनकालीन विटांचे बांधकाम, रिंगवेल (नळीची विहीर), सातवाहनकालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे मद्यकुंभ ‘अ‍ॅम्फेरा’ आणि असे बरेच काही सापडले. जमिनीखाली काळाचे अनेक थर डोक्यावर घेत गाडली गेलेली प्राचीन संस्कृतीच यामुळे प्रकाशात आली. डेक्कन कॉलेजचे डॉ. विश्वास गोगटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उत्खननामध्ये डॉ. अभिजित दांडेकर, डॉ. श्रीकांत प्रधान, शिवेंद्र काडगावकर, सचिन जोशी, रुक्सना नानजी आणि विक्रम मराठे आदी अभ्यासकांनी यात भाग घेतला होता. या उत्खननामुळे चौलला त्याची खरी ओळख मिळाली.