रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास

raigad conservation

स्वराज्याच्या स्थापनेपासून अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांना रायगड हा मूर्त साक्षीदार आहे. किल्ल्यावरील जगदीश्वर मंदीर, छत्रपती शिवरायांची समाधी, राजवाडा, वाडे, महादरवाजा, राजदरबार, अष्टप्रधान वाडे व सप्त मंजिली बुरुज तर पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांचा वाडा व समाधी ही ठिकाणे आजही या परिसरात इतिहासाची साक्ष देत आहेत. हे देशाचे वैभव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासाचा अनमोल असा ठेवा आहे. त्यामुळे या ऐतिहासिक अभिमानाच्या वारशाचे भावी पिढीसाठी जतन व्हावे तसेच त्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून समग्र विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र शासनाने रायगड किल्ला जतन, संवर्धन व पर्यटन विकास करण्याचे काम हाती घेतले.

रायगड किल्ला हा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या 11 मार्च 1909 च्या अधिसुचनेनुसार “राष्ट्रीय स्मारक” म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे तो पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणात असून त्यानुसारच्या मर्यादा तेथे लागू पडतात. रायगड महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केले की, गड किल्ल्यांचे गतवैभव परत मिळवून दिले पाहिजे, त्याकरीता किल्ले संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यात रायगडसह पाच किल्ल्यांचा समावेश करण्यात येईल. पर्यटकांना/नागरिकांना किल्ल्यांचा इतिहास जीवंत करून दाखविण्यासाठी शिवसृष्टीसारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील. केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाशी सामंजस्य करार (MOU) करून महाराष्ट्रातील किल्ल्यांचे संवर्धन व परिसराचा विकास करण्यात येईल.

पंतप्रधान महोदयांनी दि.24 डिसेंबर 2016 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्यावेळी घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज व अन्य राज्यकर्त्यांनी रायगडसह भारतात बांधलेल्या अशा सर्व किल्ल्यांना भारतीय पुरातत्व विभागामार्फत गतवैभव प्राप्त करून देणे आवश्यक आहे. रायगड किल्ला जतन व संवर्धन प्रस्तावित रु.606.09 कोटी रकमेच्या आराखड्यास मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीने दि.31 मार्च 2017 रोजी मान्यता दिली. त्यामध्ये पुढील कामे समाविष्ट आहेत. भारतीय पुरातत्व विभागामार्फत/त्यांच्या पर्यवेक्षणाखाली करावयाची कामे रु.12414.93 लाख, रायगड किल्ला/पाचाड येथील जिजाऊ समाधी/वाडा परिसरात पुरातत्व विभागाच्या पूर्व अनुमतीने घ्यावयाची कामे रु.4952.91 लाख, रायगड किल्ला परिसरात घ्यावयाची पर्यटनाची कामे रु.7991 लाख, रायगड किल्ला व परिसरातील मुलभूत सुविधांची व विकासाची कामे (7 कि.मी परिघातील 21 गावे व त्याअंतर्गत वाड्या) रु.4260 लाख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय भूतल परिवहन मंत्रालयामार्फत आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करावयाची कामे रु.20604 लाख, पाचाड येथे शिवसृष्टी व पर्यटक सुविधा केंद्र उभारण्यासाठी भूसंपादन रु.2500 लाख, रज्जू मार्ग रु.5000 लाख, आकस्मित खर्च रु.2886.13 लाख, एकूण आराखडा रु.60608.97 लाख आहे.

Add new comment