शेतीव्यवसाय (agriculture)
भात हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा क्रमांक दुसरा आहे. भाताच्या विविध जातींसंबंधी संशोधन करणारी केंद्रे कर्जत, खोपोली व पनवेल या तालुक्यात आहेत. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
पोलादपूर, महाड, रोहे या तालुक्यांत नाचणी व वरई हीदेखील पिके बर्याच प्रमाणात पिकवली जातात. याचबरोबर अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड येथे माडाच्या मोठ्या बागा असून नारळ हे मुख्य फळ घेतले जाते. पोफळी व सुपारींची आगरेही श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड येथे अधिक प्रमाणत आढळतात. श्रीवर्धन येथील रोठा जातीची सुपारी प्रसिद्ध आहे.
तसेच येथील डोंगरउतारावरील तांबड्या मातीत आंब्याची लागवड केली जाते. कमी-अधिक प्रमाणात रातांबा म्हणजेच कोकमाची झाडेही पाहायला मिळतात. या सर्व पिकांबरोबरच वाल, तूर, काजू, कलिंगड यांचेही उत्पादन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. समृद्ध (मत्स्य उपलब्धतेचा विचार करता) सागरी किनारा, खाड्या, खाजणे यांच्या अस्तित्वामुळे येथे मत्स्यशेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. प्रामुख्याने कोळंबीची शेती केली जाते.







Add new comment