सृजन विद्यालय

srujan

परिसरातील प्रत्येक मूल शाळेत आले पाहिजे, आनंदाने शिकले पाहिजे आणि या शिक्षणातून समृद्ध जीवन जगण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे” हा विचार मनात ठेवून या शैक्षणिक संकुलाची स्थापना झाली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षणाचा हक्क नाकारला जावू नये, हा विचार घेवून सुरु झालेली ही शैक्षणिक चळवळ आहे. विविध धर्म, पंथ, भाषा अनुसरणारी मुले इथे शिकतात आणि त्या सर्वांचाच संस्कृतीचा, भाषेचा आदर इथे केला जातो.

१५ जून १९९२ पासून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शिक्षणमहर्षी मा.दादासाहेब लिमये (रायगड जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष ) यांच्या प्रेरणेने कुरूळ गावातील शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते एड. प्रसाद पाटील यांनी कुरूळ येथे माध्यमिक विद्यालय सुरु केले. ‘सुधागड एज्युकेशन सोसायटी, पाली’ यांच्या माध्यमातून गेली सत्तावीस वर्षे हे माध्यमिक विद्यालय कार्यरत आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कुरूळ हे ५वी ते १०वी वर्ग असलेले शासनमान्य अनुदानित विद्यालय आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मा. वसंतशेठ ओसवाल यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असते.

पालकांच्या विनंतीवरून जून २००४ मध्ये माध्यमिक शाळेला जोडूनच शिशुवर्ग, बालवर्ग व टप्प्याटप्प्याने १ली ते ४थी असा प्राथमिक विभाग सुरु करण्यात आला. प्राथमिक विभाग हा स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शासनमान्यताप्राप्त असून सृजन विद्याप्रसारक मंडळ कुरूळ संस्थेतर्फे या प्राथमिक विभागाचे व्यवस्थापन पाहिले जाते. या प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही विभागात कुरूळ, नवेनगर, वेश्वी, बेलकडे या गावामधील विद्यार्थी शिक्षण घेतात.

हे शैक्षणिक संकुल उभे करत असताना पालकांवर किंवा ग्रामस्थांवर कोणताही आर्थिक बोजा पडू दिलेला नाही. शिक्षणप्रेमी हितचिंतकांच्या मदतीने त्यांनी स्वत: तन-मन-धनाने हे संकुल उभे केले आहे. गेल्या २६ वर्षांत विविध क्षेत्रातील अनेक नामांकित मान्यवरांनी शाळेस भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.शाळेच्या विविध उपक्रमांची नोंद अनेक समाजसेवी संस्थांनी घेतली आहे. 

Add new comment